स्तोत्रसंहिता
Chapter 7
मराठी बायबल1परमेश्वरा, माझ्या देवा, माझा तुझ्यावर विश्वास आहे. माझा पाठलाग करणाऱ्या लोकांपासून मला वाचव मला सोडव.
2तू जर मला मदत केली नाहीस तर सिंहाच्या तावडीत सापडलेल्या एखाद्या प्राण्यासारखी माझी अवस्था होईल मला दूर नेले जाईल आणि कुणीही मला वाचवू शकणार नाही.
3परमेश्वर देवा मी काहीही चूक केलेली नाही. मी चूक केली नसल्याबद्दल खात्रीपूर्वक सांगतो.
4मी माझ्या मित्रांशी दुष्टावा केला नाही आणि मी मित्रांच्या शत्रूंना मदतही केली नाही.
5जर हे खरे नसेल तर मला शिक्षा कर. शत्रू माझा पाठलाग करो, मला पकडो व मला मारो. त्याला माझे जीवन जमिनीत तुडवूदे आणिमाझा जीव मातीत ढकलू दे.
6परमेश्वरा ऊठ, आणि तुझा क्रोध दाखव माझा शत्रू रागावलेला आहे म्हणून तू त्याच्या पुढे उभा राहा आणि त्याच्या विरुध्द लढ. परमेश्वरा ऊठ आणि न्यायाची मागणी कर.
7परमेश्वरा. लोकांचा निवाडा कर. सगळे देश तुझ्याभोवती गोळा कर आणि लोकांचा निवाडा कर.
8परमेश्वरा, माझा निवाडा कर. मी बरोबर आहे हे सिध्द कर मी निरपराध आहे हे सिध्द कर.
9वाईटांना शिक्षा कर आणि चांगल्यांना मदत कर. देवा तू चांगला आहेस आणि तू लोकांच्या ह्दयात डोकावून बघू शकतोस.
10ज्याचे ह्दय सच्चे आहे अशांना देव मदत करतो म्हणून तो माझे रक्षण करेल.
11देव चांगला न्यायाधीश आहे आणि तो त्याचा क्रोध केव्हाही व्यक्त करु शकतो.
12देवाने एकदा निर्णय घेतल्यानंतर तो त्याचे मन बदलत नाही.
13देवाकडे लोकांना शिक्षा करायची शक्ती आहे.
14काही लोक सतत वाईट गोष्टी करण्याच्या योजना आखत असतात. ते गुप्त योजना आखतात आणि खोटे बोलतात.
15ते दुसऱ्यांना जाळ्यात पकडतात आणि त्यांना इजा करतात. परंतु ते स्वतच्याच जाळ्यात अडकतील आणि त्याना कुठली तरी इजा होईल.
16त्यांना योग्य अशी शिक्षा मिळेल. ते इतरांशी फार निर्दयपणे वागले. त्यांनाही योग्य अशीच शिक्षा मिळेल.
17मी परमेश्वराची स्तुती करतो, कारण तो चांगला आहे मी त्या सर्वशक्तिमान परमेश्वराच्या नावाची स्तुती करतो
Bible Study with Steffi App
Download Free ↗
Memorize verses with spaced repetition. Free, no ads, 15+ languages.