Home उत्पत्ति 5 · मराठी बायबल

उत्पत्ति

Chapter 5

मराठी बायबल
1आदामाच्या वंशावळीची नोंद अशी आहे. देवाने मनुष्य आपल्या प्रतिरुपाचा म्हणजे आपल्या सारखा निर्माण केला.
2देवाने त्यांस नर व नारी असे उत्पन्न केले. देवाने त्यांस ज्या दिवशी उत्पन्न केले त्याच दिवशी देवाने त्यांस आशीर्वाद दिला व त्यांस “आदाम” म्हणजे मनुष्य हे नाव दिले.
3आदाम एकशेतीस वर्षांचा झाल्यावर त्याला त्याच्या प्रतिरुपाचा म्हणजे हुबेहूब त्याच्या सारखा दिसणारा मुलगा झाला. त्याने त्याचे नाव शेथ ठेवले;
4शेथ जन्मल्यानंतर आदाम आठशें वर्षे जगला आणि या काळात त्याला आणखी मुलगे व मुली झाल्या.
5अशा रीतीने आदाम एकंदर नऊशेतीस वर्षे जगला; नंतर तो मरण पावला.
6शेथ एकशेंपाच वर्षांचा झाल्यावर त्याला अनोश नांवाचा मुलगा झाला.
7अनोशच्या जन्मानंतर शेथ आठशेंसात वर्षे जगला, त्या काळात त्याला आणखी मुलगे व मुली झाल्या;
8शेथ एकंदर नऊशेंबारा वर्षे जगला, मग तो मरण पावला.
9अनोश नव्वद वर्षांचा झाल्यावर त्याला केनान नावाचा मुलगा झाला;
10केनान जन्मल्यानंतर अनोश आठशेंपंधरा वर्षे जगला; त्या काळात त्याला आणखी मुलगे व मुली झाल्या;
11अनोश एकंदर नऊशेंपाच वर्षे जगला; त्यानंतर तो मरण पावला.
12केनान सत्तर वर्षांचा झाल्यावर त्याला महललेल नावाचा मुलगा झाला;
13महललेल झाल्यावर केनान आठशेंचाळीस वर्षे जगला; त्या काळात त्याला आणखी मुलगे व मुली झाल्या;
14केनान एकंदर नऊशेंदहा वर्षे जगला; नंतर तो मरण पावला.
15महललेल पासष्ट वर्षांचा झाल्यावर त्याला यारेद नावाचा मुलगा झाला;
16यारेद जन्मल्यानंतर महललेल आठशेंतीस वर्षे जगला; त्या काळात त्याला आणखी मुलगे व मुली झाल्या;
17महललेल एकंदर आठशें पंच्याण्णव वर्षे जगला; त्यानंतर तो मरण पावला.
18यारेद एकशें बासष्ट वर्षांचा झाल्यावर त्यास हनोख नावाचा मुलगा झाला;
19हनोख झाल्यावर यारेद आठशें वर्षे जगला; त्या काळात त्याला आणखी मुलगे व मुली झाल्या;
20यारेद एकंदर नऊशे बासष्ट वर्षे जगला; त्या नंतर तो मरण पावला.
21हनोख पासष्ट वर्षांचा झाल्यावर त्याला मथुशलह झाला;
22मथुशलह जन्मल्यावर हनोख तीनशें वर्षे देवाबरोबर चालला व त्या काळात त्याला आणखी मुलगे व मुली झाल्या;
23हनोख एकंदर तीनशें पासष्ट वर्षे जगला;
24एके दिवशी हनोख देवाबरोबर चालत होता; नंतर तो नाहिसा झाला कारण देवाने त्याला नेले.
25मथुशलह एकशे सत्याऐंशी वर्षांचा झाल्यावर त्याला लामेख नावांचा मुलगा झाला;
26लामेखाच्या जन्मानंतर मथुशलह सातशेंब्याऐंशी वर्षे जगला; त्या काळात त्याला आणखी मुलगे व मुली झाल्या;
27मथुशलह एकंदर नऊशें एकुणसत्तर वर्षे जगला; त्यानांतर तो मरण पावला.
28लामेख एकशें ब्याऐंशी वर्षांचा झाल्यावर त्याला एक मुलगा झाला;
29त्याने त्याचे नाव नोहा (म्हणजे विसावा) असे ठेवले. लामेख म्हाणाला, “देवाने भूमिला शाप दिल्यामुळे आपल्याला शेतकरी म्हणून खूप काष्ट करावे लागतात; परंतु नोहा आपल्याला विसावा देईल.”
30नोहा झाल्यावर लामेख पाचशें पंच्याण्णव वर्षे जगला; त्या काळात त्याला आणखी मुलगे व मुली झाल्या;
31लामेख एकंदर सातशें सत्याहत्तर वर्षे जगला; नंतर तो मरण पावला.
32नोहा पाचशें वर्षांचा झाल्यावर त्याला शेम, हाम व याफेथ नावाचे मुलगे झाले.
Bible Study with Steffi App

Memorize verses with spaced repetition. Free, no ads, 15+ languages.

Download Free ↗

Choose Theme