Home उत्पत्ति 44 · मराठी बायबल

उत्पत्ति

Chapter 44

मराठी बायबल
1मग योसेफाने आपल्या कारभाऱ्याला आज्ञा देऊन म्हटले, “या लोकांच्या पोत्यात जेवढे अधिक धान्य मावेल व त्यांना देता येईल तेवढे भर; आणि त्या सोबत प्रत्येकाचे पैसेही त्या पोत्यात ठेव.
2सर्वात धाकट्या भावाच्या पोत्यात पैशाबरोबर माझा विशेष चांदीचा प्यालाही ठेव.” त्याच्या कारभाऱ्याने त्याच्या आज्ञाप्रमाणे सर्वकाही केले.
3दुसऱ्या दिवशी अगदी सकाळी त्या भावांना त्यांच्या गाढवांसहित त्यांच्या देशाला रवाना करण्यात आले.
4त्यांनी नगर सोडल्यानंतर थोडया वेळाने योसेफ आपल्या कारभऱ्यास म्हणाला, “जा आणि त्या लोकांचा पाठलाग कर आणि त्यांना थांबवून असे म्हण, ‘आम्ही तुमच्याशी भलेपणाने वागलो! असे असता तुम्ही आमच्याशी अशा वाईट रीतीने का वागला.’ तुम्ही माझ्या स्वामीचा चांदीचा प्याला का चोरल?
5हा प्याला खास माझा धनी पिण्याकरिता वापरतात; गुप्त गोष्टी समजून घेण्यासाठी तो वापरतात. तसेच देवाला प्रश्न विचारण्याकरिता माझा धनी हया प्यालाचा उपयोग करतात. हा प्याला चोरुन तुम्ही फार वाईट केले आहे.”‘
6तेव्हा तो कारभारी स्वार होऊन व त्यांना गाठून योसेफाने आज्ञा केल्याप्रमाणे बोलला.
7परंतु ते भाऊ कारभाऱ्याला म्हणाले, “स्वामी असे का बरे बोलतात? आम्ही कधीच अशा गोष्टी करीत नाही!
8मागे आमच्या पोत्यात मिळालेले पैसे आम्ही आता येताना आठवणीने आणले; तेव्हा खात्रीने आपल्या स्वामीच्या घरातून आम्ही सोने किंवा चांदी चोरणार नाही.
9या उपर आम्हापैकी कोणाच्या पोत्यात तुम्हाला जर तो चांदीचा प्याला मिळाला तर तो भाऊ मरेल; तुम्ही त्याला मारून टाकावे आणि मग आम्ही सर्वजण आमच्या स्वामीचे गुलाम होऊ.”
10कारभारी म्हणाला, “ठीक आहे, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे आपण करु. जर मला चांदीचा प्याला मिळाला तर मग तो माणूस माझ्या धन्याचा गुलाम होईल; इतर जण जाण्यास मोकळे राहतील.”
11नंतर हर एक भावाने लगेच आपली गोणी जमिनीवर उतरुन उघडली.
12कारभाऱ्याने थोरल्या भावापासून सुरवात करुन धाकटया भावाच्या गोणीपर्यंत तपासून पाहिले; तेव्हा त्याला बन्यामीनाच्या गोणीत तो चांदीचा प्याला मिळाला.
13तेव्हा त्याभावांना भयंकर दु:ख झाले; आति दु:खामुळे त्यांनी आपली वस्त्रे फाडली आणि आपल्या गोण्या गाढवांवर लादून ते परत नगरात आले.
14यहूदा व त्याचे भाऊ परत योसेफाच्या घरी गेले. योसेफ अजून घरातच होता. त्या भावांनी योसेफापुढे लोटांगण घातले.
15योसफ त्यांना म्हणाला, “तुम्ही असे का केले? मला शकून पाहून गुप्त समजण्याचे विशेष ज्ञान आहे हे तुम्हाला माहीत नाही का? आणि या बाबतीत माझ्यापेक्षा अधिक चांगले ज्ञान इतर कोणालाही नाही!”
16यहूदा म्हणाला, “महाराज! आम्ही आता काहीच बोलू शकत नाही, व याचा उलगडा करण्याचा दुसरा मार्ग नाही. आम्ही अपराधी नाही हे पटविण्यास दुसरा कोणताच मार्ग नाही. आमच्या दुसऱ्या कोणत्यातरी अपराधाबद्दल देवाने आम्हाला दोषी ठरवले आहे. म्हणून आता बन्यामीनासकट आम्ही सर्वजण महाराजांचे गुलाम झालो आहोत.”
17परंतु योसेफ म्हणाला, “मी तुम्हा सर्वजणांना गुलाम करणार नाही! फक्त ज्याने चांदीचा प्याला चोरला तोच माझा गुलाम होईल. बाकीचे तुम्ही शांतीने आपल्या बापाकडे जाऊ शकता.”
18मग यहूदा योसेफाकडे जाऊन म्हणाला, “कृपा करुन माझ्यावर रागावू नका परंतु अगदी खरेपणाने व मोकळेपणाने मला आपल्याबरोबर बोलू द्या. आपण फारो राजासमान असून इतके अधिकार आपणाला आहेत हे मी जाणतो.
19मागच्या वेळी आम्ही येथे असताना आपण आम्हाला विचारले, ‘तुम्हाला बाप किंवा भाऊ आहे का?’
20आणि आम्ही आपणास उत्तर दिले, ‘होय! आमचा बाप आहे, परंतु तो आता फार म्हातारा झाला आहे; तसेच आम्हाला एक धाकटा भाऊही आहे. आमच्या बापाच्या म्हातारपणी हा आमचा भाऊ जन्मला म्हणून आमच्या बापाचा त्याच्यावर फार जीव आहे; आणि त्याचा तरुण भाऊ मरण पावला; तेव्हा त्या दोघांच्या आईचा हा एकच मुलगा राहिला आहे; आणि म्हणूनच तो आमच्या बापाचा फार प्रिय व लाडका मुलगा आहे.’
21आपण म्हणाला, ‘मग त्या तुमच्या धाकटया भावाला माझ्याकडे घेऊन या; मला त्याला पाहावयाचे आहे.’
22आणि आम्ही आपणास म्हणालो, ‘तो धाकटा भाऊ येऊ शकणार नाही, कारण तो बापाला सोडून कोठे जात नाही, जर का बापापासून त्याची ताटातूट झाली तर मग आमचा बाप भयंकर दु:खी होईल व त्या दु:खाने तो मरुन जाईल.’
23परंतु आपण आम्हाला बजावून म्हणाला, ‘तुम्ही तुमच्या धाकटया भावला घेऊन आलाच पाहिजे नाही तर मी तुम्हाला पुन्हा धान्य विकणार नाही.’
24म्हणून मग आम्ही आमच्या बापाकडे परत गेलो व आपण जे बोलला ते त्याला सांगितले.
25“काही दिवसानंतर आमचा बाप म्हणाला, ‘मुलांनो, पुन्हा जाऊन आपणासाठी धान्य विकत आणा.’
26आणि आम्ही म्हणालो,’ आम्ही आमच्या धाकट्या भावाला बरोबर घेतल्याशिवाय जाणार नाही कारण तुमच्या धाकट्या भावाला माझ्याकडे आणल्या खेरीज मी पुन्हा तुम्हाला धान्य विकणार नाही असे त्या प्रमुख अधिकाऱ्याने आम्हास बजावले आहे.’
27मग आमचा बाप आम्हाला म्हणाला, ‘मुलांनो, तुम्हाला माहीत आहे की माझी बायको राहेल हिच्या पोटी मला दोन मुलगे झाले;
28आणि त्यातल्या एकाला मी पाहिले तो वन्यपशूद्वारे मारला गेला. पुन्हा तो कोणाच्या दष्टीस पडला नाही.
29आणि आता माझ्या ह्या दुसऱ्या मुलाला तुम्ही माझ्यापासून घेऊन गेला आणि त्याला जर काही अपाय झाला तर मी भयंकर दु:खी होऊन मरुन जाईन.’
30तो मुलगा आमच्या बापाच्या आयुष्यात फार महत्वाचा आहे तेव्हा आता जर का आम्ही आमच्या धाकटया भावाशिवाय घरी गेलो आणि आमच्या बापाने हे पाहिले तर
31आमचा धाकटा भाऊ आमच्या बरोबर नाही असे पाहून आमचा बाप नक्की मरुन जाईल; आणि आपल्या बापाला भयंकर दु:ख देऊन त्याच्या मरणास आम्ही कारण झालो हा दोष सतत आमच्या माथ्यावर राहील.
32“हया धाकट्या भावाबद्दल मी माझ्या बापास जामीन राहिलो आहे. मी माझ्या बापास सांगितले, ‘जर मी माझ्या धाकट्या भावाला तुम्हाकडे परत घेऊन आलो नाही तर मग जन्मभर मी तुमचा दोषी राहीन.’
33तेव्हा महाराज, मी हात जोडूत तुमची काकूळतीने विनवणी करतो; तुम्हापाशी भिक्षा मागतो, त्या घाकट्या मुलाला त्याच्या भावांबरोबर परत जाऊ द्या. मी येथे राहातो आणि तुमचा गुलाम होतो माझे स्वामी!
34आणि त्या धाकटया भावशिवाय माझ्या बापाकडे माघारी जाण्याची माझ्यात हिंमत नाही! माझ्या बापाचे काय होईल याची मला भयंकर भीती वाटते, हो स्वामी!”
Bible Study with Steffi App

Memorize verses with spaced repetition. Free, no ads, 15+ languages.

Download Free ↗

Choose Theme