Home Bibles ईयोब 13 · मराठी बायबल ||

ईयोब

Chapter 13

मराठी बायबल
1ईयोब म्हणाला: “हे सर्व मी पूर्वी पाहिले आहे, तू जे म्हणालास ते सर्व मी आधीच ऐकले आहे. त्या सर्व गोष्टी मला समजतात. 2तुला जेवढे माहीत आहे तेवढेच मलाही माहीत आहे. मी तुझ्या इतकाच हुशार आहे. 3परंतु मला तुझ्याशी वाद घालायचा नाही. मला सर्वशक्तीमान देवाशी बोलायचे आहे. मला देवाबरोबर माझ्या संकटांविषयी बोलायचे आहे. 4तुम्ही तिघेजण खोटे बोलून तुमचे अज्ञान लपवीत आहात. ज्या वैद्याला कुणालाही बरे करता येत नाही अशा निरुपयोगी वैद्यासारखे तुम्ही आहात. 5तुम्ही गप्प बसावे अशी माझी इच्छा आहे. ती तुम्हाला करता येण्याजोगी सर्वात शहाणपणाची गोष्ट असेल. 6“आता माझ्या युक्तिवादाकडे लक्ष द्या मी काय म्हणतो ते ऐका. 7तुम्ही देवासाठी खोटे बोलाल का? तुमचे खोटे बोलणे देवाच्या इच्छेनुसार आहे असे तुम्हाला वाटते का? 8तुम्ही माझ्याविरुध्द देवाचा बचाव करीत आहात का? तुम्ही मुळीच न्यायाने वागत नाहीत तो देव आहे म्हणून तुम्ही त्याची बाजू घेत आहात. 9जर देवाने अगदी जवळून तुमची तपासणी केली तर, त्याला काही तरी चांगले आढळेल का? तुम्ही लोकांना जसे मूर्ख बनवू शकता तसेच देवालाही बनवू शकाल असे तुम्हाला वाटते का? 10तुम्ही जर एखादा माणूस महत्वाचा आहे म्हणून न्यायालयात त्याची बाजू घेतलीत तर देव तुमच्यावर टीका करेल हे तुम्हाला माहीत आहे. 11देवाचे मोठेपण तुम्हाला घाबरवते. तुम्ही त्याला भीता. 12तुमचे युक्तिवाद कुचकामाचे आहेत. तुमची उत्तरे कवडीमोलाची आहेत. 13“आता जरा गप्प बसा आणि मला बोलू द्या! माझे जे काही होईल ते मला मान्य आहे. 14मी मलाच संकटात लोटीन आणि माझ्याच हातात माझेच जीवन धरीन? 15देवाने मला मारुन टाकले तरी मी देवावरच विश्वास ठेवीन. पण मी त्याच्या समोर माझा बचाव करीन. 16आणि देवाने जर मला जिवंत राहू दिले तर ते मी बोलण्याइतका धीट होतो म्हणूनच असेल. पापी माणूस देवाच्या डोळ्याला डोळा भिडवू शकणार नाही. 17मी काय म्हणतो ते लक्षपूर्वक ऐका. मला नीट सांगू द्या. 18मी आता माझ्या बचावाला सिध्द झालो आहे. मी माझे मुद्दे काळजीपूर्वक मांडीन. मला माहीत आहे की मी बरोबर आहे हे मी दाखवून देईन. 19माझे चुकले आहे असे जर कुणी दाखवून दिले तर मी गप्प बसेन. 20“देवा, तू मला फक्त दोन गोष्टी दे, मग मी तुझ्यापासून लपणार नाही. 21मला शिक्षा देणे बंद कर आणि तुझ्या भयानक गोष्टींनी मला भयभीत करण्याचे थांबव. 22नंतर मला हाक मार. मी तुला ओ देईन किंवा मला बोलू दे आणि तू मला उत्तर दे. 23मी किती पापे केली आहेत? मी काय चुका केल्या आहेत? तू मला माझी पापे आणि माझ्या चुका दाखव. 24देवा, तू मला का चुकवीत आहेस? आणि मला शत्रूसारखे का वागवीत आहेस? 252तू मला घाबरवतो आाहेस का? मी वाऱ्यावर उडणारे एक पान मात्र आहे. तू गवताच्या एका काडीवर आक्रमण करीत आहेस. 26देवा, तू माझ्याबद्दल फार कटू बोलतोस. मी तरुणपणात जी पापे केली त्याबद्दल तू मला कष्ट भोगायला लावतो आहेस का? 27तू माझ्या पायात बेड्या घातल्या आहेस. माझ्या प्रत्येक पावलावर तू पाळत ठेवतोस, माझी प्रत्येक हालचाल तू टिपतोस. 28म्हणून मी कुजलेल्या लाकडासारखा, कसरीने खाल्लेल्या कापडासारखा क्षीण होत चाललो आहे”

Choose Theme