Home नीतिसूत्रे 7 · मराठी बायबल

नीतिसूत्रे

Chapter 7

मराठी बायबल
1मुला, माझे शब्द लक्षात ठेव. मी देतो त्या आज्ञा विसरु नकोस.
2माझ्या आज्ञा पाळ म्हणजे तुला जीवन मिळेल. माझ्या शिकवणुकीला तुझ्या आयुष्यातली एक महत्वाची गोष्ट बनव.
3माझ्या आज्ञा आणि माझी शिकवण सदैव तुझ्याजवळ राहू दे. त्यांना तुझ्या बोटांभोवती बांध. तुझ्या हृदयावर ते कोरुन ठेव.
4शहाणपणाला बहिणीसारखे वागव. समजुतदारपणाला तुझ्या कुटुंबाचाच एक घटक बनव.
5नंतर ते तुझा दुसऱ्या स्त्रीपासून बचाव करतील. ते तुला तिच्या पापाकडे नेणाऱ्या गोड शब्दांपासून वाचवतील.
6एक दिवस मी माझ्या खिडकीतून पाहिले आणि मला
7बरेच मूर्ख तरुण दिसले. मला एक तरुण दिसला जो खूपच मूर्ख होता.
8त्याने वाईट स्त्रीच्या घराचा रस्ता धरला. त्याला भेटण्यासाठी ती घरातून बाहेर आली.
9तेव्हा अंधार होत होता - सूर्य मावळत होता व रात्र पडायला सुरुवात झाली होती.
10ती स्त्री त्याला भेटायला घरातून बाहेर आली. तिने वेश्येसारखा पोशाख केला होता. तिने त्याच्याबरोबर पाप करायचे ठरवले.
11तिला पापाची पर्वा नव्हती. तिला चांगल्या वाईटाची पर्वा नव्हती. ती कधीच घरी राहात नसे.
12ती नेहमी रस्त्यातून हिंडे. ती संकटांना बोलावत सर्वत्र हिंडे.
13तिने त्या तरुणाला पकडले आणि त्याचे चुंबन घेतले. लाज न वाटता ती म्हणाली,
14“आज मी (शांत्यर्पणाची) मेजवानी दिली. मी जे द्यायचे वचन दिले होते ते सर्व मी दिले आणि अजूनही माझ्याकडे खूप अन्न उरले आहे.
15म्हणून मी तुला माझ्याकडे येण्याचे आमंत्रण देण्यासाठी बाहेर आले. मी तुलाच शोधत होते. आणि आता तू मला सापडलास.
16मी माझ्या अंथरुणावर स्वच्छ चादर टाकली आहे. त्या मिसर देशातल्या सुंदर चादरी आहेत.
17मी माझ्या अंथरुणावर अत्तर शिंपडले आहे. मी बोळ, अगरु आणि दालचिनीचा वापर केला आहे.
18चल, आपण सकाळ होईपर्यंत प्रेम करु या. आपण रात्रभर उपभोग घेऊ.
19माझा नवरा दूर गेला आहे. तो व्यवसायासाठी बाहेरगावी गेला आहे.
20त्याने दूरच्या प्रवासासाठी पुरेसे पैसे बरोबर घेतले आहेत. तो दोन आठवडे घरी येणार नाही.”
21त्या बाईने त्या तरुणाला भुलविण्यासाठी हे शब्द वापरले. तिच्या गोड बोलण्याला तो भुलला.
22आणि तो तरुण तिच्या मागोमाग जाळ्यात गेला. तो कत्तलखान्यात नेल्या जाणाऱ्या बैलाप्रमाणे होता. शिकारी ज्याच्या हृदयात बाण सोडायला.
23तयार आहेत अशा हरिणाप्रमाणे तो होता. तो ज्या संकटात होता ते त्याला कळले नाही.
24मुलांनो आता माझे ऐका. माझ्या शब्दांकडे लक्ष द्या.
25दुष्ट स्त्रीला तुमचा कब्जा घेऊ देऊ नका. तिच्या मार्गावरुन जाऊ नका.
26तिने खूप माणसांना पाडले आहे. तिने खूप जणांचा नाश केला आहे.
27तिचे घर म्हणजे मृत्यूचा सापळा आहे. तिचा मार्ग सरळ मरणातच जातो.
Bible Study with Steffi App

Memorize verses with spaced repetition. Free, no ads, 15+ languages.

Download Free ↗

Choose Theme