Home नीतिसूत्रे 17 · मराठी बायबल

नीतिसूत्रे

Chapter 17

मराठी बायबल
1मुबलक अन्नाने भरलेल्या भांडणयुक्त घरापेक्षा कोरड्या भाकरीच्या तुकडा शांतीने खाणे बरे!
2सेवकाचा हुशार मुलगा मालकाच्या आळशी मुलावर ताबा मिळवील. तो हुशार मुलगा मालकाचे सर्व काही घेईल.
3सोने आणि चांदी शुध्द करण्यासाठी आगीत टाकतात. लोकांची मने मात्र परमेश्वर शुध्द करतो.
4दुष्ट माणूस इतर लोक वाईट गोष्टी सांगतात त्या ऐकतो. जे लोक खोटे बोलतात ते खोटे ऐकतात सुध्दा.
5काही लोक गरीबांची थट्टी करतात. ज्यांच्यापुढे समस्या असतात त्यांना ते हसतात. या वरुन असे दिसते की ते वाईट लोक, ज्या देवाने त्यांची निर्मिती केली त्या देवाचा आदर करीत नाहीत. त्यांना शिक्षा होईल.
6नातवंडे म्हाताऱ्या माणसांना आनंदी बनवतात. आणि मुलांना त्यांच्या आईवडिलांचा अभिमान असतो.
7मूर्खाने खूप बोलणे शहाणपणाचे नसते. तसेच राज्यकर्त्याने खोटे बोलणे शहाणपणाचे नसते.
8काही लोकांना कुठेही गेले तरी लाच म्हणजे दैवी मंत्र वाटते आणि ती कामही करते असे वाटते.
9एखाद्याने तुमचे काही वाईट केल्यानंतर जर तुम्ही त्याला क्षमा करु शकला तर तुम्ही मित्र बनू शकता. पण जर तुम्ही त्याची करणी सतत मनात ठेवली तर त्यामुळे मैत्रीत बाधा येईल.
10हुशार माणूस तंबी दिल्या बरोबर शिकतो. परंतु मूर्ख माणूस शंभर फटके मारल्यावरही शिकत नाही.
11वाईट माणसाला केवळ चुकाच करायच्या असतात. शेवटी देव त्याला शिक्षा करायला देवदूत पाठवेल.
12मूर्खाला भेटण्यापेक्षा, जीची पिल्ले चोरीला गेलीत अशा चवताळलेल्या अस्वलाच्या मादीला तोंड देणे बरे!
13जे लोक तुमच्यासाठी चांगल्या गोष्टी करतात त्यांच्यासाठी तुम्ही वाईट गोष्टी करु नका. तुम्ही जर तसे केलेत तर तुम्हाला आयुष्यभर संकटांना सामोर जावे लागेल.
14वादाला तोंड फोडणे हे धरणात भोक करण्यासारखे आहे. वाद मोठा होण्याच्या आतच तो बंद करा.
15दोषी नसणाऱ्याला शिक्षा करणे आणि दोषी असणाऱ्यांचे समर्थन करणे या दोन गोष्टी परमेश्वराला आवडत नाहीत.
16मूर्खाकडचा पैसा वाया जातो. का? कराण तो मूर्ख पैशाचा वापर शहाणा होण्यासाठी करत नाही.
17मित्र नेहमी प्रेम करतो. खरा भाऊ संकटाच्या वेळीसुध्दा मदत करतो.
18केवळ मूर्खच दुसऱ्या माणसाच्या कर्जाची हमी देईल.
19ज्या माणसाला वाद घालायला आवडतो त्याला पाप करायलाही आवडते. जर तुम्ही स्वत:चीच भलावण केली तर तुम्ही संकटांना आमंत्रण देता.
20वाईट माणसाला नफा होणार नाही. जो माणूस खोटे बोलतो त्याच्यावर संकटे येतील.
21मूर्ख मुलगा असलेले वडील दु:खी होतील. मूर्खाचे वडील सुखी नसतील.
22आनंद चांगल्या औषधासारखा असतो. पण दु:ख हे आजारासारखे असते.
23वाईट माणूस दुसऱ्यांना फसवण्यासाठी गुप्ततेने पैसे घेतो.
24शहाणा माणूस नेहमी सर्वांत चांगली गोष्ट करण्याचा विचार करतो. पण मूर्ख माणूस दूरच्या जगाचे स्वप्न पाहातो.
25मूर्ख मुलगा वडिलांसाठी दु:ख आणतो आणि जिने त्याला जन्म दिला त्या आईसाठी वेदना आणतो.
26काहीही चूक केली नसताना एखाद्याला शिक्षा करणे चूक आहे. जे नेते प्रामाणिक असतात त्यांना शिक्षा करणे चूक आहे.
27शहाणा माणूस शब्द काळजीपूर्वक वापरतो. शहाणा माणूस लवकर रागावत नाही.
28मूर्ख माणूस जर गप्प बसला तर तो सुध्दा शहाणा वाटतो. जर तो काही बोलला नाही तर तो शहाणा आहे असे लोकांना वाटते.
Bible Study with Steffi App

Memorize verses with spaced repetition. Free, no ads, 15+ languages.

Download Free ↗

Choose Theme