Home Bibles 1 इतिहास 11 · मराठी बायबल ||

1 इतिहास

Chapter 11

मराठी बायबल
1सर्व इस्राएल लोक हेब्रोन येथे दावीदाकडे जमले. ते त्याला म्हणाले, “आम्ही तुझे भाऊबंद आहोत, तुझ्याच रक्तामांसाचे आहोत. 2पूर्वी लढाईत तू आमचे नेतृत्व केले आहेस. शौल राजा असतानाही तू ते केले आहेस. परमेश्वर तुला म्हणाला, ‘दावीदा, तू माझ्या इस्राएल लोकांचा मेंढपाळ होशील. माझ्या लोकांचे नेतृत्व करशील.”‘ 3इस्राएल लोकांमधील सर्व वडीलधारी मंडळी दावीद राजाकडे हेब्रोन येथे आली. परमेश्वरासमोर दावीदाने त्यांच्याशी करार केला. तेव्हा त्या पुढाऱ्यांनी दावीदास अभिषेक केला. आता दावीद इस्राएलाचा राजा झाला. शमुवेल मार्फत परमेश्वराने असे होणार असे वचन दिले होते. 4सर्व इस्राएल लोकांबरोबर दावीद यरुशलेम नगराकडे गेला. यरुशलेमला त्याकाळी यबूस असे म्हणत असत; आणि तेथे राहणाऱ्यांना यबूसी. ते नगरवासी 5दावीदाला म्हणाले, “तू आमच्या नगरात पाऊल टाकू शकणार नाहीस.” तरीही दावीदाने त्यांचा पाडाव केलाच. दावीदाने सियोनचा किल्ला घेतला. यालाच दावीदानगर हे नाव पडले. 6दावीद म्हणाला, “यबूसी लोकांवरील हल्ल्याचे जो नेतृत्व करील तो माझा सेनापती होईल.” यवाबने हे नेतृत्व केले. हा सरुवेचा मुलगा. यवाब सेनापती झाला. 7दावीदाने किल्ल्यातच आपला मुक्काम केला म्हणून त्याला दावीद नगर नाव पडले. 8या किल्ल्याभोवती दावीदाने नगराची उभारणी केली. मिल्लो पासून नगराच्या तटबंदीपर्यंत त्याने ते बांधले. जेथे पडझड झाली होती तिथे दुरुस्ती केली. 9दावीदाच्या मोठेपणात भर पडत गेली. सर्वशक्तिमान परमेश्वर त्याच्या बाजूचा होता. 10दावीदाच्या, खास सैनिकांच्या पुढाऱ्यांची नावे या यादीत आहेत. दावीदाच्या राज्यात त्यांचेही बळ वाढले. त्यांनी आणि समस्त इस्राएल लोकांनी दावीदाला पाठिंबा दिला आणि त्याला राजा केले. देवाने कबूल केल्याप्रमाणेच हे घडले. 11दावीदाकडील खास सैनिकांची नावे अशी : याशबाम हखमोनी. हा रथचालकांचा प्रमुख होता. याशबाम एकावेळी तीनशे जणांना आपल्या भाल्याने ठार करु शकत असे. 12त्यानंतर दोदय अहोही याचा मुलगा एलाजार. एलाजार तिघा पराक्रमींपैकी एक होता. 13पसदम्मीम येथे हा दावीदाबरोबर होता. पलिष्टे त्या ठिकाणी लढायला आले होते. तेथे शेतात जवाचे पीक उभे होते. इस्राएल लोक तेव्हा पळून गेले. 14पण तीन शूर वीर तिथेच पाय रोवून उभे राहिले आणि त्यांनी बचाव करायचा प्रयत्न केला. पलिष्ट्यांचा त्यांनी पराभव केला. परमेवराने इस्राएल लोकांना मोठा विजय मिळवून दिला. 15एकदा, दावीद अदुल्लामच्या गुहेत होता. पलिष्ट्यांचे सैन्य तिथून खाली रेफाईमच्या खोऱ्यात होते. त्यावेळी तीस वीरापैकी तिघेजण गुहेत असलेल्या दावीदाकडे जायला जमिनीवरुन सरपटत रांगत निघाले. 16आणखी एकदा दावीद किल्ल्यांत असताना पलिष्ट्यांचे सैन्य बेथलहेममध्ये होते. 17तेव्हा आपल्या गावचे पाणी प्यावे असे दावीदाला फार वाटले. तो म्हणाला, “बेथलहेमच्या वेशीजवळ विहीर आहे तिच्यातले पाणी मला कोणी आणून दिले तर किती बरे होईल.” त्याला पाणी हवे होते असे नाही पण तरी तो हे म्हणाला. 18यावर त्या तिघांनी पलिष्ट्यांच्या छावणीतून मोठ्या हिकमतीने वाट काढली, बेथलहेमच्या वेशीजवळच्या विहिरीतील पाणी काढले आणि ते त्या तिघांनी दावीदाला आणून दिले. दावीदाने ते पाणी प्यायला नकार दिला. त्याने ते जमिनीवर ओतून परमेश्वराला अर्पण केले. 19दावीद म्हणाला, “देवा, हे पाणी मी कसे पिऊ? हे मी प्यायलो तर ते इथपर्यंत आणायला ज्यांनी आपला जीव धोक्यात घातला त्यांचे रक्तच प्यायल्यासारखे होईल.” त्याने ते पाणी न प्यायचे कारण हे होय. त्या तीन शूरांनी असे बरेच पराक्रम केले. 20यवाबचा भाऊ अबीशय हा या तिघांचा प्रमुख होता. त्याने आपल्या भाल्याने तीनशे जणांचा प्रतिकार केला आणि त्यांना ठार केले. अबीशय त्या तिघांएवढाच प्रसिध्द होता. 21त्या तीन शूरांपेक्षा जास्त याने नाव कमावले. तो त्या तिघामधला नसला तरी त्यांचा नायक झाला. 22यहोयादा हा एका बलाढ्य माणसाचा मुलगा होता. यहोयादाचा मुलगा बनाया. हा कबसेल येथला होता. बनायाने खूप पराक्रम केले. मवाबातील दोन अग्रगण्य माणसांना त्याने ठार केले. एकदा बर्फ पडत असताना गुहेत शिरुन त्याने सिंहाचा वध केला. 23मिसरच्या एका मजबूत सैनिकालाही त्याने मारले. हा सैनिक साडेसात फूट उंचीचा होता. त्याच्याजवळ चांगला लांब आणि भक्कम भाला होता. विणकराच्या मागावरील तुळईएवढा हा भाला होता. बनायाजवळ फक्त गदा होती. बनायाने त्या सैनिकाच्या हातून भाला हिसकावून घेतला आणि त्यानेच त्या मिसर सैनिकाला ठार केले. 24यहोयादाचा मुलगा बनाया याने असे बरेच पराक्रम केले. तीन शूरांप्रमाणेच त्याने नाव मिळवले. 25तीस शूरांपेक्षा बनायाचा बोलबाला जास्त झाला. पण तो त्या तिघांपैकी नव्हता. दावीदाने बनायाला आपल्या अंगरक्षकांचे प्रमुख म्हणून नेमले. 26सैन्यातील शूर सैनिक (तीस वीर) पुढीलप्रमाणे: यवाबचा भाऊ असाएल, बेथलेहेमच्या दोदोचा मुलगा एलहानान, 27हरोरी शम्मोथ, हेलस पलोनी, 28तकोइच्या इक्केशचा मुलगा ईरा, अनाथोथचा अबियेजेर 29शिब्बखाय हूशाथी, ईलाय अहोही, 30महरय नटोफाथी, बाना नटोफाथी याचा मुलगा हेलेद, 31बन्यामीनांच्या संतानांमधला गिबोथकर रीबय याचा मुलगा इत्तय, बनाया पिराथोनी, 32गाशच्या झऱ्यांजवळचा हूरय, अबीएल अर्बाथी, 33अजमावेथ बहरुमी, अलीहबा शालबोनी, 34हामेश गिजोनी याचे मुलगे, शागे हरारी याचा मुलगा योनाथान, 35साखार हरारी याचा मुलगा अहीयाम, ऊरचा मुलगा अलीफल, 36हेफेर मखेराथी, अहीया पलोनी, 37हेस्त्री कर्मेली, एजबयचा मुलगा नारय, 38नाथानचा भाऊ योएल, हग्रीचा मुलगा मिभार, 39सेलक अम्मोनी, सरुवेचा मुलगा यवाब याचा शस्त्रवाहक नहरय बैरोथी, 40ईरा, इथ्री, गारेब, इथ्री, 41उरीया हित्ती, अहलयाचा मुलगा जाबाद, 42शीजा रउबेनी याचा मुलगा अदीना हा रउबेन्यांचा अधिकारी व तीस शूरांपैकी एक, 43माकाचा मुलगा हानान आणि योशाफाट मिथनी, 44उज्जीया अष्टराथी, होथाम अरोएरी याचे मुलगे शामा ईयेल 45शिम्रीचा यदीएल योहा तीसी आणि त्याचा भाऊ योहा 46अलीएल महवी व एलानामचे मुलगे यरीबय आणि योशव्या व इथ्मा मवाबी, 47अलीएल, ओबेद न यासीएल मसोबायी.

Choose Theme