Home रोमकरांस 3 · मराठी बायबल

रोमकरांस

Chapter 3

मराठी बायबल
1तर मग यहूदी असण्यात फायदा काय? किंवा सुंतेपासून फायदा काय?
2सर्व बाबतीत पुष्कळच आहे. कारण सर्वप्रथम त्यांना देवाची वचने विश्वासाने सोपविण्यात आली होती.
3हे खरे आहे की त्यातील काही अविश्वासू होते; देवाच्या विश्वासूपणाला अविश्वासूपणा नाहीसा करील काय?
4खात्रीने नाही! देव खरा असलाच पाहिजे आणि प्रत्येक मनुष्य खोटा, पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, “तू बोलशील तेव्हा योग्य ठरशील आणि तुझा न्याय होत असता तू विजय मिळविशील.”
5जर आपल्या दुष्टपणामुळे देवाचा न्याय स्पष्ट होत असेल तर त्याला काय म्हणावे? देव जो आपणावर क्रोध आणतो त्याला अनीतिमान म्हणावे काय? (मी हे मानवाप्रमाणे बोलतो).
6खात्रीने नाही! कारण मग देव जगाचा न्याय कसा करील?
7परंतु तुम्ही असे म्हणाला की, “जर देवाचा खरेपणा माझ्या खोटेपणामुळे त्याच्या गौरवासाठी उठून दिसत असेल, तर मग मी पापी का गणला जातो?”
8आपण का वाईट करु नये जर त्याचा परिणाम चांगला होत असेल. कारण काही जण आपल्या विरुध्द वाईट बोलत आहेत, आणि त्यानां मिळणारी शिक्षा त्याबद्दलचा न्याय आहे.
9तर मग काय? आम्ही यहूदी, विदेशी लोकांपेक्षा अधिक चांगल्या स्थितीत आहोत काय? मुळीच नाही! कारण यहूदी आणि ग्रीक हे सारखेच पापाच्या अधिकाराखाली आहेत.
10शास्त्रात असे लिहिले आहे:“पापाशिवाय असा कोणीही नाही. एकही नाही.
11समंजस असा कोणी नाही. कोणीही देवाचा शोध करीत नाही.
12ते सर्व दूर गेले आहेत, आणि सर्व लोक निरुपयोगी झाले आहेत. चांगले करणारा कोणी नाही, एकही नाही.”स्तोत्र. 14:1-3
13“लोकांची तोंडे उघड्या कबरांसारखी आहेत ते आपल्या जिभांनी लोकांना फसवितात.” स्तोत्र. 5:9“ते ज्या गोष्टी बोलतात त्यात सापाचे विष असते.” स्तोत्र. 140:3
14“त्यांची तोंडे शापांनी आणि कडूपणाने भरली आहेत.” स्तोत्र. 10:7
15“त्यांचे पाय रक्तपात करण्यास नेहमी तयार असतात.
16जेथे कोठे ते जातात तेथे विध्वंस व विपत्ती आणतात.
17त्यांना शांतीचा मार्ग माहीत नाही.” यशया 59:7-8
18“त्यांच्या डोळ्यांपुढे देवाचे भय नाही.” स्तोत्र. 36:1
19आता आपणाला माहीत आहे की, नियमशास्त्र जे सांगते ते नियमशास्त्राच्या आधिन असणाऱ्यांकरिता आहे व मनुष्यांच्या कामचुकार पणाला आळा घालण्यासाठी व सर्व जगाला चांगले व पूर्ण होण्यासाठी आहे. त्या नियमशास्त्र प्रमाणे सर्व दोषी आहेत.
20नियमशास्त्राच्या कर्मांनी कोणीही देवासमोर नीतिमान ठरणार नाही. कारण नियमशास्त्राद्वारे पापाची जाणीव होते.
21परंतु आता देवाची मानवाविषयीची नीतिमत्तवाची कृती नियमशास्त्राव्यतिरिक्त प्रगट झाली आहे. त्याला नियमशास्त्र आणि संदेष्ट्यांची साक्ष आहे.
22देवाची नीतिमत्त्वाची कृती ही येशू ख्रिस्तावरील विश्वासाद्वारे आहे आणि जे विश्वास ठेवतात त्या सर्वांसाठी दाखविली आहे. त्यात भेदभाव नाही.
23सर्वानी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत.
24परंतु त्यांना देवाने त्याच्या कृपेने येशू ख्रिस्ताद्वारे खंडणी भरुन नीतिमान ठरविले आहे.
25लोकांच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून ख्रिस्ताचे रक्त सांडून देवाने त्याला जाहीरपणे पुढे केले. देवाने हे यासाठी सिद्ध केले की तो नीतिमात आहे हे सिद्ध व्हावे.
26देवाच्या सहनशीलतेमुळे त्याने हे सिद्ध केले की, या सध्यच्या काळी तो नीतिमान आहे. यासाठी जो ख्रिस्तावर विश्वास ठेवतो, तो नीतिमान असावा.
27मग आमच्या बढाई मारण्याचे प्रयोजन काय? ती वगळ्ण्यात आली. कोणत्या प्रकारच्या नियमाने? कर्माच्या काय? नाही, तर ज्यामध्ये विश्वास आहे, त्याच्या आधारे.
28कारण आपण असे मानतो की, मनुष्य देवावरील विश्वासाने नियमशास्त्रातील कर्मशिवाय नीतिमात ठरतो.
29किंवा देव फक्त यहूद्यांचाच आहे काय? तो विदेशी लोकांचा नाही काय? होय, तो विदेशी लोकांचादेखील आहे.
30ज्याअर्थी देव एकच आहे, त्याअर्थी तो ज्यांची सुंता झाली आहे, त्यांच्या विश्वासाने आणि ज्यांची सुंता झालेली नाही अशांनाही विश्वासाने नीतिमान ठरवील.
31तर मग आपण या विश्वासाचा आग्रह धरुन नियमशास्त्र निरर्थक ठरवितो काय? खात्रीने नाही, आपण तर नियमशास्त्राला मान्यता देतो.
Bible Study with Steffi App

Memorize verses with spaced repetition. Free, no ads, 15+ languages.

Download Free ↗

Choose Theme