Home योहान 11 · मराठी बायबल

योहान

Chapter 11

मराठी बायबल
1लाजर नावाचा एक मनुष्य आजारी होता. तो बेथानी गावात राहत होता. याच गावात मार्था आणि मरीया राहत होत्या.
2ज्या मरीयेने प्रभूला सुगंधी तेल लावले व त्याचे पाय आपल्या केसांनी पुसले तिचा हा भाऊ होता.
3त्या बहिणींनी येशूला निरोप पाठविला की, हे प्रभु ज्याच्यावर तू प्रीति करतोस तो आजारी आहे.
4पण येशूने हे ऐकून म्हटले, “हा आजार मरणासाठी नव्हे तर देवाच्या गौरवासाठी आहे. याद्वारे देवाचे गौरव व्हावे यासाठी हा आजार आहे.”
5येशू मार्था, मरीया व लाजर यांच्यावर प्रीति करीत असे.
6म्हणून तो आजारी आहे हे ऐकल्यावरही तो होता त्याच ठिकाणी दोन दिवस राहिला.
7नंतर त्याने शिष्यांना म्हटले, “आपण यहूदीयात परत जाऊ.”
8शिष्य त्याला म्हणाले, “गुरुजी, यहूदी आपणांस दगडमार करु पाहत होते आणि आपण पुन्हा तेथे जात आहात काय?”
9येशूने उत्तर दिले, “दिवसाचे बारा तास असतात की नाहीत? जर एखादा दिवसा चालतो, तर त्याला ठेच लागत नाही. कारण तो या जगाचा प्रकाश पाहतो.
10पण जर कोणी रात्री चालतो, तर त्याला ठेच लागते कारण त्याच्याकडे प्रकाश नसतो.”
11या गोष्टी बोलल्यानंतर तो त्यांना म्हणाला, “आपला मित्र लाजर झोपी गेला आहे. पण मी त्याला झोपेतून जागे करावे तरीही जात आहे.”
12तेव्हा त्याचे शिष्य म्हणाले, “प्रभु, तो झोपी गेला असेल तर बरा होईल.”
13पण येशू खरे तर त्याच्या मरणाविषयी बोलला होता. पण तो त्याच्या नेहमीच्या झोपेविषयी बोलत आहे, असे त्यांना वाटले.
14तेव्हा येशूने त्यांना स्पष्ट सांगितले, “लाजर मेला आहे.
15आणि मी तेथे नव्हतो म्हणून मला तुमच्यामुळे आनंद वाटतो. यासाठी की तुम्ही विश्वास धरावा. आपण त्याच्याकडे जाऊ या.”
16तेव्हा दिदुम म्हटलेला थोमा शिष्यांना म्हणाला, “आपणही त्याच्याबरोबर जाऊ या अशासाठी की आपणही त्याच्याबरोबर मरु.”
17येशू आल्यावर त्याला समजले की, लाजराला चार दिवसांपूर्वीच कबरेत ठेवण्यात आले आहे.
18बेथानी यरुशलेमापासून तीन किलोमीटर अंतरापेक्षा कमी होते.
19आणि पुष्कळसे यहुदी मार्था, मरीयेकडे त्यांचा भाऊ मेला याबद्दल सांत्वन करण्यासठी आले होते.
20जेव्हा मार्थाने ऐकले की, आपल्या घरी येशू येत आहे तेव्हा ती त्याला भेटायला बाहेर गेली, पण मरीया घरातच राहिली.
21‘प्रभु’ मार्था येशूला म्हणाली, “तू जर येथे असतास तर माझा भाऊ मेला नसता,
22पण मला माहीत आहे की, तू जे मागशील ते देव तुला देईल.”
23येशू म्हणाला, “तुझा भाऊ पुन्हा उठेल.”
24मार्था म्हणाली. “मला माहीत आहे शेवटच्या दिवशी पुनरुत्थानाच्या वेळेस तो पुन्हा उठेल.”
25येशू तिला म्हणाला, “मी पुनरुत्थान आणि जीवन आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असेल तरी जगेल.
26आणि जो कोणी जगतो आणि माझ्यावर विश्वास ठेवतो. तो कधीच मरणार नाही. तू यावर विश्वास ठेवतेस काय?”
27‘होय प्रभु.’ ती त्याला म्हणाली, “तू ख्रिस्त आहेस असा मी विश्वास धरते. तू या जगात आलेला आहे देवाचा पुत्र आहेस.”
28आणि असे म्हटल्यानंतर ती परत गेली आणि आपली बहीण मरीया हिला एका बाजूला बोलाविले आणि म्हणाली, “गुरुजी येथे आहेत. आणि ते तुला विचारीत आहेत.”
29जेव्हा मरीयेने हे ऐकले तेव्हा ती लगेच उठली आणि त्याच्याकडे गेली.
30आता तोपर्थंत येशू त्या खेड्याच्या आत आला नव्हता. तर मार्था त्याला भेटली, तेथेच अजूनपर्थंत होता.
31तेव्हा जे यहूदी तिच्या घरात तिचे सांत्वन करीत होते ते, मरीया लगबगीने उठून बाहेर गेली असे पाहून ती कबरेकडे शोक करायला गेली असे समजून तिच्यामागे गेले.
32मग जेथे येशू होता तेथे मरीया आल्यावर ती त्याला पाहून त्याच्या पाया पडली व त्याला म्हणाली, “प्रभु, आपण येथे असता तर माझा भाऊ मेला नसता.”
33मग येशू तिला रडताना पाहून व तिच्याबरोबर असलेल्या यहूद्यांनाही रडताना पाहून आत्म्यात व्याकुळ झाला व हेलावून गेला.
34तो म्हणाला, “तुम्ही त्याला कोठे ठेवले आहे?” ते म्हणाले, “प्रभु, या आणि पाहा.”
35येशू रडला.
36तेव्हा यहूदी म्हणाले, “पहा! त्याला तो किती आवडत होता.”
37पण त्यांच्यातील कित्येक म्हणाले, “ज्याने आंधळ्याचे डोळे उघडले, त्या या मनुष्याला लाजराला मरणापासून वाचविता येऊ नये काय?”
38मग येशू पुन्हा अंत:करणात विव्हळ झाला असता कबरेकडे आला. ती गुहा होती, आणि तिच्यावर दगड लोटला होता.
39येशूने म्हटले, “हा दगड काढा.” मार्था म्हणाली, “पण प्रभु, लाजर मरुन चार दिवस झाले आहेत, त्याला आता दुर्गंधी येत असेल.” ती मृत लाजराची बहीण होती.
40येशूने तिला म्हटले, “जर तू विश्वास धरशील तर देवाचे गौरव पाहशील, असे मी तुला सांगितले नव्हते काय?”
41मग त्यांनी दगड बाजूला केला. तेव्हा येशू वर पाहून म्हणाला, “पित्या, तू माझे ऐकले, म्हणून मी तुझे उपकार मानतो.
42आणि तू नेहमीच माझे ऐकतोस हे मला माहीत आहे, पण जो लोकसमुदाय आजूबाजूला उभा आहे त्यांच्यासाठी मी हे बोललो. यासाठी की तू मला पाठविले आहेस यावर त्यांनी विश्वास ठवावा.”
43असे बोलल्यावर त्याने मोठ्याने हाक मारली, “लजरा, बाहेर ये.”
44मग जो मेला होता तो लाजर जिवंत होऊन बाहेर आला. त्याचे हात पाय वस्त्रांनी बांधले होते व तोंड रुमालाने झाकले होते. येशू लोकांना म्हणाला. “त्याला मोकळे करा आणि जाऊ द्या.”
45जे यहूदी मरीयेकडे आले होते, त्यांनी येशूने जे केले ते पाहिले आणि त्यांच्यापैकी पुष्कळांनी त्याच्यावर विश्वास ठेवला.
46पण त्यांच्यातील काहींनी परुश्यांकडे जाऊन येशूने जे केले होते ते त्यांना सांगितल.
47तेव्हा मुख्य याजकांनी व परुश्यांनी सभा भरवून म्हटले, हा मनुष्य पुष्कळ चमत्कार करीत आहे.
48आम्ही त्याला असेच राहू दिले तर सर्व लोक त्याच्यार विश्वास ठेवतील आणि रोमी येऊन आमचे मंदिर व राष्ट्र दोन्हीही घेतील.”
49तेव्हा त्यांच्यातील कयफा नावाचो व्यक्ति त्या वर्षी प्रमुख याजक होती. तो त्यांना म्हणाला, “तुम्हांला काहीच माहिती नाही!
50तुम्ही हे लक्षात घेत नाही की, सर्व लोकांसाठी एका माणसाने मरणे हे सर्व राष्ट्राचा नाश होण्यापेक्षा हिताचे आहे.”
51तो हे स्वत: होऊन बोलला नाही तर त्यावर्षी तो प्रमुख याजक होता म्हणून त्याने संदेश दिला की, येशू त्या राष्ट्राकरिता मरणार आहे.
52केवळ त्या राष्ट्रासाठी असे नाही, तर यासाठी की, त्याने देवाच्या पांगलेल्यांना एकत्र करावे, म्हणून तो मरणार आहे.
53म्हणून त्या दिवसापासून त्यांनी त्याला जिवे मारण्याची मसलत केली.
54यामुळे येशू तेव्हापासून उघडपणे यहूघांमध्ये फिरला नाही. त्याऐवजी तो रानाजवळच्या प्रदेशातील ऐफ्राईम नावाच्या नगरात गेला व तेथे शिष्यांसह राहिला.
55तेव्हा यहूघांचा वल्हांडण सण जवळ आला होता आणि सणाअगोदर पुष्कळ लोक आपणांस शुद्ध करायला देशातून वर यरुशलेमेस गेले.
56ते येशूचा शोध करीत राहीले, आणि मंदिरात उभे असताना एकमेकास म्हणाले, “तुम्हाला काय वाटते? तो सणाला येणार नाही काय?’
57पण मुख्य याजक व परुश्यांनी अशी आज्ञा केली होती की, येशू कोठे आहे हे ज्याला कळेल त्याने त्यांना कळवावे, म्हणजे ते त्याला पकडू शकतील.
Bible Study with Steffi App

Memorize verses with spaced repetition. Free, no ads, 15+ languages.

Download Free ↗

Choose Theme