Home ईयोब 37 · मराठी बायबल

ईयोब

Chapter 37

मराठी बायबल
1“गडगडाट व वीजा ह्यांची मला भिती वाटते. तेव्हा माझ्या ह्दयाची धडथड वाढते.
2प्रत्येक जण लक्षपूर्वक ऐका! देवाचा आवाज गडगडाटासारखा वाटतो. देवाच्या मुखातून येणारा गडगडाटासारखा आवाज ऐका.
3देव त्याच्या विजेला सर्व आकाशात चमकण्यासाठी पाठवतो. ती सर्व पृथ्वीभर चमकते.
4वीज चमकते तेव्हा देव गडगडाटी आवाज काढतो. देव त्याच्या अद्भुत आवाजात गर्जतो. वीज चमकल्यानंतर देवाची गर्जना ऐकू येते.
5“देवाचा गडगडाटी आवाज अद्भुत आहे. देव आपल्याला न काळणाऱ्या महान गोष्टी करत असतो.
6देव ‘हिमाला पृथ्वीवर पडण्याची आज्ञा करतो.’ देव ‘पावसाला पृथ्वीवर जोरात पड असे सांगतो.’
7देवाने निर्माण केलेल्या सर्व लोकांना तो काय करु शकतो हे कळावे म्हणून देव या गोष्टी करतो हा त्याचा पुरावा आहे.
8पशू त्यांच्या घरकुलात जातात आणि तेथेच राहतात.
9दक्षिणेकडून चक्रीवादळ येते. उत्तरेकडून थंड वारे येतात.
10देवाच्या नि:श्वासाने बर्फ होते आणि समुद्र गोठतो.
11देव ढगांना पाण्याने भरतो आणि तो ते पसरवतो.
12तो ढगांना सर्व पृथ्वीभर पसरण्याची आज्ञा करतो. देव जी आज्ञा देती ती ढग पाळतात.
13देव लोकांना शिक्षा करण्यासाठी ढग आणतो, पूर आणतो किंवा त्याचे प्रेम व्यक्त करण्यासाठी पाणी आणतो.
14“ईयोब, एक क्षणभर थांब आणि लक्ष दे. थांब आणि देव ज्या अद्भुत गोष्टी करतो त्यांचा विचार कर.
15ईयोब, देव ढगांवर आपला अधिकार कसा गाजवतो ते तुला माहीत आहे का? तो विजेला कसे चमकावितो ते तुला माहीत आहे का?
16ढग आकाशात कसे तरंगतात ते तुला कळते का? देव ज्या अद्भुत गोष्टी करतो त्याचे ढग हे केवळ एक उदाहरण आहे. आणि देवाला त्याबद्दल सारे माहीत आहे.
17परंतु ईयोब तुला या गोष्टी माहीत नाहीत. तुला फक्त एवढेच माहीत आहे की दक्षिणेकडून गरम वारे वाहतात तेव्हा तुला घाम येतो, तुझे कपडे अंगाला चिकटतात आणि सगळे काही स्तब्ध असते.
18ईयोब, तू देवाला आकाश पसरवण्यात आणि ते आरशाप्रमाणे करण्यात मदत करु शकशील का?
19“ईयोब, देवाला आम्ही काय सांगायचे ते तू आम्हांला सांग. काय बोलावे ते आम्हाला कळत नाही कारण आम्हाला जास्त माहिती नाही.
20मला देवाशी बोलायचे आहे असे मी म्हणणार नाही. तसे म्हणणे म्हणजे स्वत:चा नाश करुन घेणे आहे.
21माणूस सूर्याकडे बघू शकत नाही. वाऱ्याने ढग पळवून लावले की तो फार तेजस्वी आणि चकचकीत दिसतो.
22आणि देवसुध्दा तसाच आहे. देवाची सुवर्णप्रभा दक्षिणेकडील पर्वतावरुनचमकते. देवाच्या भोवती तेजोवलय असते.
23तो सर्वशक्तिमान देव महान आहे. आपण त्याला समजू शकत नाही. तो सामर्थ्यवान आहे. परंतु तो आपल्याशी चांगला आणि न्यायाने वागतो. देवाला आपल्याला त्रास द्यायची इच्छा नसते.
24म्हणूनच लोक देवाला मान देतात. परंतु देव आपल्या शहाणपणाचा अभिमान बाळगणाऱ्या लोकांना मान देत नाही.”
Bible Study with Steffi App

Memorize verses with spaced repetition. Free, no ads, 15+ languages.

Download Free ↗

Choose Theme