Home अनुवाद 21 · मराठी बायबल

अनुवाद

Chapter 21

मराठी बायबल
1“तुमचा देव परमेश्वर तुम्हाला देणार असलेल्या प्रदेशात एखाद्याचा उघड्यावर खून झालेला आढळला आणि मारेकऱ्याचा पत्ता लागला नाही
2तर तुमच्यापैकी वडीलधारे आणि न्यायाधीश यांनी पुढे येऊन मृतदेहापासून सभोवर पसरलेल्या गावांचे अंतर मोजावे.
3मग जो गाव प्रेताच्या सर्वात जवळचा असेल तेथील वडिलधाऱ्यांनी आपल्या कळपातील एक गाय निवडावी. कधीही कामाला न जुंपलेली व अजून न व्यायलेली अशी ती गाय असावी.
4मग तिला वाहता झरा असलेल्या खोऱ्यांत आणावी. हे खोरे कधी पेरणी, नांगरणी न झालेले असावे. अशा ठिकाणी त्या गायीची मान कापावी.
5लेवी वंशातील याजकांनी या वेळी तिथे असावे. (आपली सेवा करुन घ्यायला आणि आपल्या वतीने लोकांना आशीर्वाद द्यायला तुमचा देव परमेश्वर ह्याने त्यांची याजक म्हणून निवड केली आहे. प्रत्येक वादात किंवा मारामारीत ते निवाडा करतील.)
6त्या खोऱ्यात, मृताच्या जवळच्या नगरातील वडील माणसांनी, गाय मारल्यावर तिच्या मानेतून वाहणाऱ्या रक्ताने आपले हात धुवावे.
7व म्हणावे ‘या व्यक्तीला आमच्या हातून मरण आले नाही. ही घटना घडताना आम्ही पाहिली नाही. परमेश्वरा तू इस्राएलाल वाचवलं आहेस.
8आम्हाला तू आपलस केल आहेस. आमचा उद्धार केला आहेस. आम्हाला शुद्ध कर. एका निरपराध व्यक्तीच्या हत्त्येबद्दल आम्हाला दोषी धरु नकोस. असे केले असता त्या निरपराध व्यक्तीच्या हत्येचे पाप या लोकांना लागणार नाही.’
9याप्रमाणे परमेश्वराच्या दृष्टिने जे योग्य ते करुन तुम्ही आपल्यामधून या पापाचा निचरा करा.
10“शत्रूशी युद्ध करायला गेल्यावर तुमचा देव परमेश्वर ह्याच्या साहाय्याने तुम्ही शत्रूला पराभूत कराल व त्याच्या सैनिकांना बंदीवान कराल.
11तेव्हा बंदिवानात एखादी सुंदर स्त्री पाहून तिच्याशी लग्न करावे असे एखाद्याला वाटेल.
12तेव्हा त्याने तिला आपल्या घरी आणावे. तिने आपले केशवपन करावे व नखे कापावी.
13तिचे पहिले, युद्धकैदीचे द्योतक असलेले वस्त्रही काढून टाकावे. आपल्या आईवडलांपासून दुरावल्याबद्दल तिने पूर्ण महिनाभर त्याच्या घरी शोक करावा. मग त्याने तिच्याजवळ जावे. म्हणजे तो तिचा पती व ती त्याची पत्नी होईल.
14पुढे त्याला ती आवडली नाही तर त्याने घटस्फोट देऊन तिला मुक्त करावे. पण तिची विक्री करु नये. तिला गुलाम म्हणूनही त्याने वागवता कामा नये. कारण त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवला होता.
15“एखाद्याला दोन बायका असतील आणि त्याचे एकीवर दुसरीपेक्षा जास्त प्रेम असेल. दोघींना मुले असतील. पण नावडतीचा मुलगा सगळ्यात मोठा असेल.
16अशा परिस्थितीत, आपल्या मालमत्तेची वाटणी करताना ज्येष्ठ मुलाच्या वाटणीचे, आवडतीच्या मुलाला देऊ नये.
17त्याने आपल्या ज्येष्ठ पुत्राचा नावडतीचा मुलगा असला तरी स्वीकार केला पाहिजे. तसेच आपल्या एकंदर मालमत्तेतील दुप्पट वाटा त्याला दिला पाहिजे. कारण तो ज्येष्ठ पुत्र आहे. व त्यालाच जेष्ठपणाचा हक्क आहे.
18“एखाद्याचा मुलगा हट्ठी अजिबात न ऐकणारा, आईबापांना न जुमानणारा निघतो. शिक्षा केली तरी काही फरक पडत नाही.
19अशावेळी आईवडलांनी त्याला गावच्या चावडीवर वडीलधाऱ्यांपुढे न्यावा.
20त्यांनी सांगावे की, हा उद्दाम आहे. आमचे ऐकत नाही. तसेच तो खादाड व मद्यपी आहे.
21यावर त्या गावातील माणसांनी या मुलाला दगडांनी मरेपर्यंत मारावे. असे केल्याने तुम्ही हे पाप आपल्यामधून काढून टाकाल. इस्राएलमधील इतर लोकांच्या कानावर ही गोष्ट गेली की ते घाबरुन राहतील.
22“एखाद्याचा अपराध मुत्युदंड मिळण्याइतका मोठा असेल. अशावेळी त्याच्या देहान्ता नंतर लोक त्याचे प्रेत झाडाला टांगतील.
23तेव्हा ते रात्रभर झाडावर टांगलेले राहू देऊ नका. त्याचदिवशी कटाक्षाने त्याचे दफन करा. कारण झाडाला टांगलेल्या त्या मृतदेहाला देवाचा शाप असतो. तुमचा देव परमेश्वर तुम्हाला देणार असलेली भूमी अशी विटाळू नका.
Bible Study with Steffi App

Memorize verses with spaced repetition. Free, no ads, 15+ languages.

Download Free ↗

Choose Theme